2007 साली इतिहास विषय घेऊन एम. ए. उत्तीर्ण झालो. उरात एकच ध्येय होते, प्राध्यापक व्हायचं! अर्थात त्या काळीही सोपे नव्हते, आता ही नाही. पण लाथ मारू तिथे पाणी काढू' असा जोश अंगात भरला होता.! (काही काळाने निघून गेला.)
प्राध्यापक व्हायचे तर NET व SET या परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे होते. त्यावेळी ही परीक्षा लेखी स्वरूपाची होती. उत्तीर्ण होणार्याचे प्रमाण तसे कमी होते, त्यात मार्गदर्शन करनातऱ्यांचे प्रमाण नगण्य होते. पण मला अशी व्यक्ती भेटली जी SET उत्तीर्ण होती. मार्गदर्शनासाठी विचारले तर साहेबांनी सल्ला दिला, 'पेपर निळे करून या, पास व्हाल'. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मी मिळवलेले हे पहिले व शेवटचे मार्गदर्शन..
तरीही नेटाने तयारीला लागलो. अनेक पुस्तके मिळवली (काही ग्रंथालयातून मिळाली, काही खरेदी केली.) अभ्यास सुरू झाला, परीक्षा येत गेल्या मी देत राहीलो आणि मोजक्या मार्क्ससाठी नापास होत गेलो.
दरम्यान तासिका तत्वावरील प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली.. आनंद गगनात मावेनासा झाला. इमाने इतबारे नोकरी करू लागलो, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा प्रयत्न करत होतो..
संशोधनामध्ये आवड असल्याने एम. फील. / पीएच. डी. करण्याचा निर्णय घेतला. एम. फील.ला प्रवेश मिळाला आणि संशोधन सुरू झाले.
यातच गडकोट भटकण्याचे वेड लागले.. जमेल तसे, सुट्टी मिळेल तशी भटकंती सुरू झाली.
एम. फील. करता करता समाज सुधारणा चळवळीत गेलो. काम करू लागलो.. चळवळ होती मुस्लीम सत्यशोधक मंडळ ची.! समाजाच्या सुधारणेची..!
पण या सगळ्याचा व्हायचा तो परिणाम होत होता.. तो म्हणजे परीक्षांमध्ये अपयश..!
भरीस भर म्हणून आता दोनाचे चार हात झाले. त्यात आनंदाची बाब म्हणजे पत्नी समजूतदार, शांत, मनमिळाऊ आणि कमवती आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे... (तिच्याबद्दल नंतर कधीतरी)
यावेळेपर्यंत ना NET / SET झाले होते ना एम. फील. भटकंती सुरूच होती. चळवळ चालू होती, संसाराचा गाडा ओढत होतो, समस्या मात्र वाढत होत्या.
दोन वर्षांनी आणखी एक नवीन पाहुणा घरी आला. आमचं छोटंसं बाळ..! आमची कन्या झीनत. बाळ आल्याने जबाबदारी आणखी वाढली. कमाई कमी पडू लागली.. जास्त कमाई करणे गरजेचे होते. विचारांती प्राध्यापकी सोडून दुसरा जास्त कमाई होईल अशी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी लवकरात लवकर एम. फील. पूर्ण करण्याचा आणि जमेल तसे अभ्यास करून NET / SET मध्ये पात्र होण्याचा निर्धार केला. वर्ष होते 2014! यावेळी ही आणखी एक चांगली गोष्ट घडली, ती म्हणजे वाडवडिलोपार्जित संपत्तीतून डोक्यावर स्वतः चे छत मिळाले. आजपर्यंत भाड्याच्या घरात राहत होतो!
प्राध्यापकी सोडली. नवीन नोकरी मिळाली एम. आर. (मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह) काम फिरतीचे होते. सातारा, वाई, कोरेगाव, पाटण, ढेबेवाडी, कराड अशी गावे फिरावी लागत, मोटारसायकल वरून.. यात वेळ बराच जाऊ लागला. दिवस भरभर सरत होते. कमाई बऱ्यापैकी होत होती पण त्रास होत होता, प्राध्यापकी सोडल्याचा. मन लागत नव्हते. तरीही प्रामाणिकपणे काम करत होतो. अभ्यासाला अजिबात वेळ मिळत नव्हता. त्यामुळे या काळात ना एम. फील. पूर्ण झाले ना NET/SET.!
नोकरी चे स्वरूप फिरतीचे! दिवस जात होते. रिकामा वेळ फारसा मिळत नव्हता आणि मिळालाच तर तो परिवार, मित्र मैत्रिणी, चळवळ आणि भटकंती यात जात होता. परिणामी अभ्यास होत नव्हता. त्याची सारखी खंत लागून राहत होती...
मग मनात विचार घोळू लागले, की एखादा उद्योग सुरू करावा. जेणेकरून कमाई वाढेल आणि अभ्यासाला वेळ ही मिळेल. बऱ्याच विचारांती नोकरी सोडून पोल्ट्री फार्मिंग करण्याचा निर्णय घेतला.
एक जुनी पोल्ट्री भाडेतत्वावर मिळाली. ती सुरू केली. सुरुवातीला बराच वेळ जायचा पण नंतर रिकामा वेळ मिळू लागला. पण पण पण
अभ्यास काही होत नव्हता. परीक्षा देणे, नापास होणे हा सिलसिला सुरूच होता. एम. फील कडे तर पूर्ण दुर्लक्ष झाले होते. यामुळे निराश व्हायला सुरुवात झाली होती..
हां हां म्हणता दीड वर्ष गेले. सगळं कसं बऱ्यापैकी सुरळीत चालू होते. पत्नीने कोचिंग क्लासेस सुरू केले होते. तिचा जम बसत चालला होता. कमाई चांगली होऊ लागली होती.
पण माझे मन रमत नव्हते. 'काय होतास तू, काय झालास तू' असे वाटायचे. त्यामुळे आणखी निराश वाटायचे. अंगातली शिक्षक होण्याची खुमखुमी गप बसू देत नव्हती. कुठलीही सामान्य नोकरी, उद्योग हे आपले क्षेत्र नाही, शिक्षकी पेशातच आपल्याला गती आहे, तोच पेशा पत्करला पाहिजे असे वाटे.
माझ्याबरोबर अनेकांना असेच वाटत होते. पत्नीलाही असेच वाटायचे. तिचे म्हणणे होते, 'तुम्ही दोन तीन महिने चांगला अभ्यास करा, दुसऱ्या कशाकडेही लक्ष देऊ नका, तुम्ही नक्की पास व्हाल. या काळात घर मी चालवते.!' तिचा सल्ला मी मानला, तीन महिने अभ्यासाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. हा काळ होता मे 2017. पुढील परीक्षा नोव्हेंबर महिन्यात होती. NET ची. निर्णय घेतला आणि अभ्यास सुरू केला.. पण घात झाला...
जून च्या मध्यानंतर माझ्या वडिलांची तब्बेत खराब झाली व नंतर अतिशय वेगाने खालावत गेली. याच आजारात 14 जुलै 2017 रोजी त्यांनी आमचा, या जगाचा निरोप घेतला.! मी पुरता खचलो..! निराश झालो.. त्यात आणखी एक संकट कोसळले, ज्यातून बाहेर पडण्यास दोन अडीच महिने लागले. (त्याबद्दल नंतर कधीतरी.)
यावेळेपावेतो ऑक्टोबर निम्म्या ओलांडून गेला होता. NET ची परीक्षा 5 नोव्हेंबरला होती. दिवस खूप कमी होते, अभ्यास काहीच झाला नव्हता. थोडा फार अभ्यास करून परीक्षा दिली. पण पेपर खूप अवघड गेले. त्यामुळे पुन्हा निराशा.! पण नंतर कळले, पेपरच खूप अवघड होते. निकाल सुद्धा खूप कमी लागला होता.
निकाल काय लागणार याची कल्पना मला आली होतीच.. त्यामुळे आम्ही पतिपत्नी ने पुन्हा एकदा चर्चा केली आणि पत्नीने माझ्यावर विश्वास ठेवून परत मला काही काळ अभ्यासासाठी दिला. महिना होता नोव्हेंबर 2017, आणि पुढील परीक्षा होती 28 जानेवारी 2018 ला SET ची. आता मी परत अभ्यास सुरू केला. नेटाने सुरू ठेवला. परीक्षा दिली, आणि आनंदी मनाने घरी आलो. पेपर खूप सोप्पे होते किंवा मला खूप सोपे गेले होते.
काही दिवसांनी Answer keys आल्या. त्याआधारे माझे गुण होत होते 230/350! (64%) पेपर सोपे असल्याने cutoff किती लागेल? कदाचित तो खूप जास्त लागेल असे वाटत होते. मार्क्स चांगले मिळूनही ही परीक्षा पात्र होईन की नाही याची शाश्वती वाटत नव्हती. खूप धाकधुक होत होती.
यावेळी पात्र होणे गरजेचे होते, हा निर्वाणीचा काळ होता. पण..
आता मे महिना उजाडला. निकाल अजून लागला नव्हता. निम्मा मे संपला. तोपर्यंत निकाल कधी लागेल ही चिंता सतावत होती. आणि तो दिवस उजाडला. 24 मे 2018.!
दिवस पूर्ण काही किरकोळ कामात गेला. संध्याकाळी चहा घेऊन व्हाट्सअप पाहत असताना निकाल लागल्याचे समजले. Cutoff होता 60%.. ! माझे होत होते 64% म्हणजे आपण पात्र ठरलो आहोत असे वाटले. विश्वास बसत नव्हता. खात्री करणे गरजेचे होते. लगेच SET ची वेबसाईट तपासली आणि खात्री पटली. खरच मी पास/पात्र झालो होतो.. माझा आनंद गगनात मावेना.. पत्नी किचन मध्ये काम करत होती. तिला बोलावले. काही न बोलता निकाल दाखवला. तो वाचून तिला रडूच आले.. हे आनंदाश्रू होते.. अनेक वर्षांपासून चे अधुरे स्वप्न साकार झाले होते...! मी जरी पात्र झालो असलो तरी माझ्या पत्नीचा वाटा त्यात खूप मोठा होता. या यशाचे सगळे श्रेय तिचेच! माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पाठीशी ती खंबीरपणे उभी राहिली म्हणून मी हे स्वप्न साकारू शकलो..!
आता पात्र झालो आहे. आता पुन्हा नोकरी चा शोध.. पण हा शोध एका निश्चित टप्प्यावर घेऊन जाणारा असेल. नोकरी मिळाली की आयुष्याचे सार्थक झाले, असे नाही. (सार्थक तेंव्हा होईल जेंव्हा मी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडेन!!) त्यामुळे आयुष्याला एक नवे वळण मिळेल. एका नव्या आयुष्याची, नव्या जबाबदारीची सुरुवात होईल... ती जबाबदारी पेलायची आहे आणि आपणा सर्वांच्या साथीने, पाठबळाने ती पेलेनही..!
या संपूर्ण प्रवासात अनेकांचे सहकार्य लाभले, अनेकांनी अनेक परीने मदत केली. अडीअडचणीला धाऊन आले, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्या सगळ्याच ज्ञात अज्ञातांचा मी ऋणी आहे. त्यांचे आभार मी मानणार नाही, मानलेले त्यांना आवडणार नाही..
तुमची साथ नेहमी अशीच सोबत राहो..
टीप : आत्मप्रौढीचा दोष पत्करून हे सर्व लिहिले आहे. माझ्या या कथानातील चुका तुम्ही पोटात घ्यालच याची खात्री आहे. चूक झाली असल्यास क्षमस्व..
आपला.
अझर.
No comments:
Post a Comment