प्राचीन काळापासून भारताला उज्वल सांस्कॄतिक वारसा लाभलेला आहे. वैदिक‚ बौद्ध‚ जैन‚ ख्रिस्ती‚ पारशी‚ इस्लाम व शीख या धर्मांच्या समन्वयातून भारताचे सांस्कॄतिक जीवन खूपच समॄध्द झाले आहे. या सर्व धर्मांमध्ये अनेक रूढी‚ प्रथा‚ परंपरा‚ रितीरिवाज व कर्मकांडे आहेत. कालौघात या रूढी‚ प्रथा‚ परंपरांमथ्ये काही दोष निर्माण झाले. काही अनिष्ठ प्रथा कालबह्म ठरल्या. त्या सामाजिक स्वास्थ्याला बाधक ठरू लागल्या. त्यामुळे कालानुरूप त्यात बदल होण्याची गरज निर्माण झाली. हि गरज ओळखून भारतातील राजा राममोहन रॉय ते गाडगे महाराजांपर्यंतच्या अनेक समाजसुधारकांनी व विचारवंतांनी हे दोष दुर करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच 19 व्या शतकामध्ये व 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात समाज व धर्मसुधारणा चळवळींची एक मालिकाच संपूर्ण भारतामध्ये सुरू झाली. मात्र या काळातील बहुतांशी समाज व धर्मसुधारणा चळवळी हिंदू धर्म व परंपरेशी निगडीत होत्या. असे असले तरी इतर धर्मातही काही विचारवंत व समाजसुधारक पुढे आले. त्यांनी आपल्या समाजात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. स्वातंञ्योत्तर काळात मुस्लिम समाज सुधारणेसाठी आपले जीवन अर्पित करणारे हमीद दलवाई हे एक ‘सत्यशोधक समाजसुधारक’ होत. त्यांनी जुबानी तलाक‚ धर्मभोळेपणा‚ अज्ञान‚ कट्टरता‚ कर्मठता यांना विरोध करत असतानाच तलाक पिडीत स्त्रीयांच्या समस्या सोडवणे‚ त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी कार्य केले. मुस्लिम समाज सुधारणेसाठी विज्ञानाधारित शिक्षणाचा‚ समान नागरी कायद्याचा त्यांनी पुरस्कार केला, हमीद दलवाईनी केलेले कार्य महत्वाचे असले तरी समाजाने व इतिहास अभ्यासकांनी त्यांच्या कार्याची फारशी दखल घेतलेली नाही. त्यांच्या कार्याचा अभ्यास होणे आवश्यक असल्याने या शोधनिबंधाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
या
शोधनिबंधाच्या लिखानासाठी तत्कालिन कागदपत्रे‚ चरित्रे‚ आत्मचरित्रे‚ नियतकालिके‚ वर्तमानपत्रे‚ मुलाखती इ. साधनांचा उपयोग करण्यात आला आहे.
शाह वलीउल्लाह‚ सर सय्यद अहमद खान‚ मौलवी मुमताज अली‚ शेख अब्दुल्ला‚ बेगम अब्दुल्ला‚ बेगम अब्बास तैयबजी‚ नजर सय्यद हैदर‚ बेगम भोपाल सुलतान जहान इ.नी शिक्षणाद्वारे मुस्लिम समाजात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला.1 मात्र यातील कोणीही मुस्लिम समाजातील प्रथा‚ परंपरांची हमीद दलवाई यांच्याप्रमाणे तर्ककठोर चिकित्सा केली नाही. मुस्लिम समाजाच्या सर्वश्रेष्ठत्वाच्या भावनेला व जमातवादी जाणिवांच्या मूलभूत समस्येला हात घालून हमीद दलवाईंनी समाज प्रबोधनाला सुरूवात केली.
हमीद
दलवाई यांचा जन्म 29 सप्टेंबर
1932 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण
जवळील मिरजोळी या गावी झाला.2 त्याच्या
घरची आर्थिक परस्थिती अत्यंत बिकट होती. पैश्यांच्या
अडचणीमुळे त्यांना आपले महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण करता आले नाही. 1946 मध्ये साने गुरूजींच्या राष्ट्रसेवादलामध्ये ते
दाखल झाले.3 येथेच
त्यांच्यावर समाजवादी विचारांचा प्रभाव पडला. आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी काही काळ त्यांनी
रेल्वेमध्ये नोकरी केली. पुढे
ते आचार्य अत्रेंच्या ‘मराठा’मध्ये दाखल झाले. तेथे त्यांनी पाच वर्षे पत्रकार म्हणून काम
केले.
तत्कालिन महाराष्ट्रातील मुस्लिम समाज हा मोठया प्रमाणावर अशिक्षीत असुन त्याच्यावर धार्मिक प्रथा‚ परंपरा यांचा खूप मोठा पगडा होता. व्यक्तिच्या जीवनाचे नियमन इस्लामी धर्मपरंपरा व शरियतचा कायदा याप्रमाणे व्हावे, असे पुराणमतवाद्यांना वाटत होते. शरियतचा कायदा4 हा स्त्रियांवर अन्याय करणारा होता. स्त्रिया समान हक्कांपासून वंचित होत्या. स्त्रियांवर होणारे अत्याचार‚ तोंडी तलाक‚ बहुभार्या पध्दत‚ पडदा पध्दत‚ शिक्षणाचा अभाव‚ कुटुंबनियोजनाविषयी अनास्था‚ समान नागरी कायद्याऐवजी शरियतच्या कायद्याचा पुरस्कार इ. अनेक गोष्टींमुळे मुस्लिम स्त्रियांची परिस्थिती अत्यंत बिकट होती. तलाकपिडीत स्त्रियांची अवस्था अत्यंत दयनिय असून त्यांना पोटगी मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत असे. स्त्रियांची ही परिस्थिती बदलणे गरजे होते. तसेच मुस्लिम समाजात प्रबोधनपर कार्य झाल्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य निर्माण होणार नाही, अशी हमीद दलवार्इ यांची खात्री होती. म्हणूनच मुस्लिम समाजामध्ये सुधारणा व प्रबोधनासाठी कार्य करण्याचे त्यांनी ठरवले. “दै. मराठा”मधील नोकरी सोडून ते या कार्याकडे वळले आणि त्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले.
इस्लाम मधील विवाह‚ तलाक‚ स्त्रीविषयक दॄष्टिकोन व शरीयतप्रणीत कायदा यामध्ये बदल झाल्याशिवाय प्रबोधनच होणार नाही5 असा विचार त्यानी केला. त्यासाठी ‘जुबानी तलाक पध्दत बंद झाली पाहिज’‚ ‘समान नागरी कायदा झाला पाहिजे’ या मागण्यांचे फलक हाती घेऊन सात तलाकपिडीत महिलांचा ऐतिहासिक मुकमोर्चा मुंबई विधानसभेवर 1966 मध्ये काढून त्यांनी आपल्या कार्याची सुरूवात केली.6 यापाठीमागे व्यक्तिच्या जीवनावर असणारा धर्माचा प्रभाव कमी करणे ही प्रमुख भूमिका होती.7 इस्लामच्या चौदाशे वर्षांच्या इतिहासात ही गोष्ट अभूतपूर्व होती. कारण मुस्लिम स्त्रीयांचा असा मोर्चा पूर्वी कधीही काढला गेला नव्हता. हमीद दलवार्इंनी तो प्रथमच काढून समाज प्रबोधनाच्या कार्याची सुरूवात केली होती.
एप्रिल
1968 मध्ये त्यांनी मुस्लिम स्त्रीच्या समस्यांना वाचा फोडण्याच्या उद्देशाने ‘सदा–ए–निस्वॉं’ (स्त्रियांचा
आवाज) नावाची मुस्लिम स्त्रीयांची संघटना उभारली.8
आपल्या
कार्याला संघटितपणा आणण्यासाठी 20 मार्च 1970 रोजी त्यांनी ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’ची पुणे येथे स्थापना केली.9 मात्र
मंडळाचे कोणतेही पद निस्वार्थीपणे नाकारून मंडळाला बाहेरून मार्गदर्शन करण्याची
भूमिका त्यानी घेतली. या
मंडळाच्या माध्यमातून त्यांनी स्त्रीयांच्या समस्या‚ स्त्रीयांसाठी
रोजगार‚ तलाकची समस्या‚ पोटगी‚ कुटुंब नियोजन‚ समान
नागरी कायद्याचा पुरस्कार‚ मुस्लिम
समाजात शिक्षणप्रसार करणे इ. प्रश्नांवर
कार्य केले. अल्पावधीतच
मंडळाच्या पुणे‚ मुंबई‚ सोलापूर‚ कोल्हापूर‚ अहमदनगर‚ श्रीगोंदे‚ फलटण‚ अमरावती‚ अचलपूर‚ परतवाडा‚ औरंगाबाद
इ. ठिकाणी शाखा निघाल्या.10
अ. भि. शहा यांनी स्थापन केलेल्या इंडियन सेक्युलर सोसायटीच्या (1966) स्थापनेमध्ये हमीद दलवाईंनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. ते या सोसायटीचे उपाध्यक्षही होते.11 ‘इंडियन सेक्युलर सोसायटी’ व ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ’ या दोन्ही संस्थांनी हमीद दलवाईंच्या नेतॄत्वाखाली चार व पाच डिसेंबर 1971 ला दिल्ली येथे ‘ऑल इंडिया फॉरवर्ड लुकिंग मुस्लिम कॉंन्फरन्स’चे आयोजन केले होते. या परिषदेस महाराष्ट्र‚ आंध्रप्रदेश‚ प. बंगाल व दिल्ली येथील 100 निमंत्रीत उपस्थित होते. या परिषदेमध्ये समान नागरी कायद्याच्या मागणीचा ठराव संमत करण्यात आला.12 तसेच कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करण्यात येऊन बांगलादेशाच्या स्वातंञ्ययुध्दाला पाठिंबा दिला गेला.13
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या पुढाकाराने जमाते इस्लामी‚ मुस्लिम लीग व इतर मुस्लिम संघटनांची एक अखिल भारतीय मुस्लिम परिषद मुंबई येथे 27 व 28 डिसेंबर 1972 रोजी भरली होती.14 या परिषदेमध्ये शरियत कायदा ईश्वरीय असल्याने त्यात बदल करण्याचे हक्क संसदेला नाहीत, असा ठराव मांडला गेला. ही परिषद काटेकोर बंदोबस्तात घेतली गेली असून पत्रकार‚ मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्यकर्ते व हमीद दलवाईंना या परिषदेत प्रवेश नाकारण्यात आला होता. या परिषदेसमोर हमीद दलवाईंनी 25 कार्यकर्त्यांसह मोर्चा काढून निदर्शने केली. मात्र विरोधकांनी या मोर्चावर हल्ला केला होता.
मार्च 1973 मध्ये मुंबई येथे पार पडलेल्या ‘मुस्लिम सोशल रिफॉर्म कॉंन्फरन्स’चे हमीद दलवाई हे अध्यक्ष होते.15 या परिषदेस 300 प्रतिनीधी उपस्थित असून त्यातील 50 मुस्लिम महिला होत्या. तसेच प्रा. ए. ए. ए. फैजी‚ प्रा. शहा‚ डॉ. मोईन शाकिर‚ प्रा. कुलसूम पारेख इ. मान्यवर उपस्थित होते. मुस्लिमांचे भारतीयकरण झाले पाहिजे, असा विचार मांडून हमीद दलवाई म्हणाले होते‚ “जोपर्यंत मुसलमानात वैचारिक स्वातंञ्य येणार नाही तोपर्यंत मुसलमान सुधारणार नाहीत.”16
मुस्लिम सत्यशोधक मंडळाने कोल्हापूर येथे 1973 साली आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या शैक्षणिक परिषदेस हजर राहून श्रोत्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विज्ञानावर आधारित शिक्षणावर भर दिला. आपली भौतिक प्रगती घडवून आणण्यासाठी मुस्लिमांनी प्रादेशिक भाषेतून शिक्षण घ्यावे, असा ठराव या परिषदेमध्ये करण्यात आला.17 याच परिषदेमध्ये मुस्लिम वफ्फ बोर्डच्या पैश्यांच्या होणाऱ्या गैरवापराचा हिशोब ट्रस्टींनी द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच वफ्फचा पैसा विज्ञानावर आधारित शिक्षणावर खर्च केला जा,वा अशी सुचना ही करण्यात आली होती. या शैक्षणिक परिषदेस 800 प्रतिनिधी उपस्थित असून त्यात 250 स्त्रीयांचा समावेश होता.18
तलाकपिडीत
महिलांची 23 नोव्हें. 1975
रोजी पुण्यात परिषद घेण्यात आली.19 त्यात त्यांनी तलाकपिडीत महिलांचे
प्रश्न समजावून घेण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राबरोबरच दिल्ली‚ अहमदाबाद‚ कोलकत्ता
येथून 175 महिला या परिषदेस उपस्थित होत्या. मुस्लिम स्त्रियांना समान हक्क मिळावेत‚ मुस्लिमांना व्दिभार्या प्रतिबंधक कायदा लागू
करावा‚ जुबानी तलाकवर कायद्याने बंदी घालवी या मागण्यांचे
ठराव या परिषदेमध्ये संमत करण्यात आले होते. मुस्लिम स्त्रियांच्या हक्कांची मागणी करणारी
ही जगातील पहिली परिषद होती.
लोकसंख्यावाढीची भीषणता त्यांना जाणवली असल्याने त्यांनी मुस्लिमांच्या कुटुंबनियोजनाचा पुरस्कार केला. भारतासारख्या मागासलेल्या देशात लोकसंख्यावाढीला परिणामकारक आळा घातला गेला नाही तर दारिद्ररेषेखालच्या सत्तर टक्के लोकांना त्या रेषेवर येण्याची देखिल कधीच आशा नाही, असे त्यांना वाटे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या अमरावती शाखेने कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली.20
हमीद दलवाईंचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रापुरते मर्यादीत नसून दिल्ली‚ अलिगढ‚ हैद्राबाद‚ कलकत्ता यांसारख्या शहरातूनही त्यांनी मुस्लिम तरूणांमध्ये प्रबोधनाचे कार्य केले.21 परदेश दौरे करून ठिकठिकाणी व्याख्याने दिली. अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे भरलेल्या मुस्लिम देशांच्या परिषदेस ते उपस्थित होते. इंग्लंड‚ फ्रांस व जर्मनी येथे दौरे आयोजित करून व्याख्याने दिली.22 जाहिर व खाजगी चर्चा करून त्यांनी मुस्लिम समाजात प्रबोधन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. ‘हमीद दलवाई आमच्या समोर येत नाहीत. आमच्याशी चर्चा करत नाहीत, असा आरोप परंपरावादी मुस्लिम नेते त्यांच्यावर करत’ म्हणून ते पुण्यातील मोमीनपुरा भागामध्ये चर्चा करण्यासाठी गेले असता तेथील लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ते जखमी झाले.23 अनेकदा त्यांना ठार मारण्याच्या धमक्या येत, परंतु जीवाची पर्वा न करता त्यांनी आपले प्रबोधनाचे कार्य चालू ठेवले. मुस्लिम समाजाला आपण न पेलणारे असे जबर हादरे देत आहोत, याची त्यांना जाणिव होती आणि तसे हादरे दिल्याशिवाय मुस्लिम समाजात प्रबोधनाची प्रक्रिया सुरू होणार नाही, असे त्यांना वाटे. त्यांनी मुस्लिम प्रबोधनाकडे मानवतेच्या व्यापक भूमिकेतून पाहिले. प्रखर बुध्दिवादी व मानवतेवर आधारित राष्ट्रवादी प्रेरणा मुसलमानांत निर्माण करण्यासाठी आणि मानवी ऐक्याचा एक घटक असणाऱ्या हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी ते आयुष्यभर झगडले. त्यांच्या कार्याच्या प्रभावामुळेच त्यांच्या भोवती बाबूमिया बॅण्डवाले‚ सय्यद भाई‚ शेख वझीर पटेल‚ हुसेन जमादार‚ प्रा. मुमताज रहिमतपुरे यांसारखे अनेक कार्यकर्ते जमा झाले.
वर्तमानपत्रे‚ नियतकालीके इ.च्या माध्यमातून विविध विषयांवर
लेख लिहून समाजप्रबोधन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी लिहिलेला ‘लाट’ (1961)
हा कथासंग्रह व ‘इंधन’ (1965) ही कादंबरी प्रसिध्द असून तिला
महाराष्ट्र शासनाचे पहिले बक्षीस मिळाले आहे.24 त्याचबरोबर त्यांनी ‘मुस्लिम जातीयतेचे स्वरूप कारणे व उपाय’ (1968)‚ ‘मुस्लिम
पॉलिटिक्स इन सेक्यूलर इंडिया’ (इंग्रजी‚1970) हे वैचारिक ग्रंथही लिहले आहेत. त्यांचा ‘इस्लामचे
भारतीय चित्र’ (1982) हा ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रकाशित
करण्यात आला.25 एक प्रतिभावान लेखक म्हणून ते प्रसिध्द होते.
कोकणसारख्या
मराठी प्रदेशात जन्मलेले आणि मराठी भाषेबद्दल आस्था व अभिमान बाळगणारे हमीद
दलवाई हे पुरोगामी विचारांचे समाजसुधारक होते. भारतीय संस्कृती व राज्यघटना याविषयी त्यांना
नितांत आदर वाटत असे. धर्मनिरपेक्षता
व धार्मिक स्वातंञ्य यांचे दलवाई पुरस्कर्ते होते. मानवाच्या विकासामध्ये धर्म आड येऊ नये यासाठी धर्म व समाजसुधारणा केली पाहिजे,
असे त्यांचे मत होते. व्यक्तिगत
धार्मिक कायद्याऐवजी भारतात राहणाऱ्या सर्व नागरिकांना एकच समान नागरी कायदा असावा,
असे त्यांना वाटत होते. समान
नागरी कायद्याचा पुरस्कार करून विविध जमांतीमध्ये राजकीय सामंजस्य निर्माण
करण्याची कल्पना त्यांनी मांडली.26 मुंबई महानगरपालिकेच्या
निवडणुकीच्या निमीत्ताने ‘वंदे
मातरम्’चा वाद उफाळून आला असता त्यावर प्रतिक्रिया
व्यक्त करताना ते म्हणाले होते “कुराणमध्ये
मुर्तिपूजा करू नका, असे म्हटले आहे. तसेच अल्लाह पुढे नतमस्तक व्हा असाही आदेश
देण्यात आला आहे.... परंतु ईश्वराखेरीज दुसऱ्या कशाबद्दलही आदर बाळगू नये, असा
विचीत्र अर्थ कसा काय काढण्यात येतो?.... मुस्लिम बांधवांनी या गीतामागील
स्वातंञ्यलढ्याच्या भावना समजून घेण्याची आवश्यकता आहे.”27
मुत्रपिंडाच्या
आजारामुळे वयाच्या अवघ्या पंचेचाळीसाव्या वर्षी 3 मे 1977 रोजी मुंबई येथे
त्यांचे अकाली निधन झाले.28 त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून फाय
फौंडेशनने ते हयात असतानाच त्यांना पंधरा हजारांचं बक्षिस दिलं.29 “हमीद दलवाईंच्या अकाली निधनाने केवळ मुस्लिम प्रबोधनाचीच नव्हे तर भारतातील समाजिक
प्रबोधनाची फार मोठी हानी झाली आहे” असे
प्रा. फक्रुद्दिन बेन्नूर यांनी म्हटले आहे.30
निष्कर्ष :–
कट्टर धार्मिक विचारांचा पगडा असलेल्या मुस्लिम समाजाविरूध्द बोलणेही ज्याकाळात अवघड होते, अशावेळी हमीद दलवाईंनी अनिष्ठ इस्लामी प्रथा‚ परंपरांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी इस्लाममधील स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या व मुस्लिम समाजाच्या मागासलेपणास जबाबदार ठरलेल्या अनिष्ठ प्रथांवर घणघणाती प्रहार केले. असे करत असतानाच मुस्लिम समाजाच्या समस्या भारतातील इतर धर्मिय जनतेपुढे प्रभावीपणे मांडल्या. त्यामुळे मुस्लिम समाजातही अमूलाग्र सुधारणा होण्याची आवश्यकता असल्याची जाणीव समाजामध्ये निर्माण झाली. मुस्लिम समाजातील सुशिक्षित वर्ग आपल्या समाजातील समस्यांकडे डोळसपणे पाहू लागला. ज्याप्रमाणे महात्मा फुले यांनी हिंदू धर्मातील अनिष्ठ प्रथा‚ परंपरांविरूध्द बंडखोरी करून समाजसुधारणा केली, त्याचप्रमाणे हमीद दलवाईंनी मुस्लिम समाजात अमूलाग्र सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच आपल्या अल्पायुष्यात त्यांनी केलेले कार्य मुस्लिम समाज व एकूण भारतीय समाजाच्या दॄष्टीने चिरंतन प्रेरणादायी ठरले आहे. जे मुस्लिम आपल्या समाजामध्ये सुधारणा घडवून आणू इच्छितात त्यांना हमीद दलवाईंचे मुस्लिम समाजसुधारणेचे विचार व कार्य मार्गदर्शक ठरतील.
संदर्भ साधने :
1. व्होरा
आशाराणी‚ ‘भारतीय
नारी : दशा दिशा‚ (हिंदी)
नॅशनल पब्लिशिंग हाऊस‚ नवी
दिल्ली‚ 1983. पृष्ठ क्र. 144.
2. जोशी
लक्ष्मणशास्त्री (सं.)‚ मराठी
विश्वकोश खंड 13‚ महाराष्ट्र
राज्य विश्वकोश निर्मीती मंडळ‚ मुंबई‚ 1987. पृष्ठ क्र. 784.
3. घागरे
सुचित्रा‚ हमीद
दलवाई‚
दै. लोकसत्ता वृतांत‚ 24 सप्टेंबर 2005‚ पृष्ठ क्र. 4.
4. शरीयत
म्हणजे पवित्र कुराणाव्दारे अवतरीत झालेला अल्लाहचा पवित्र कायदा होय. पवित्र कुराणाची शिकवण व संदेश
मुहंमद पैगंबरांची स. वचने
हदिस आणि आचरण सुन्नत यातून प्रस्थापित झालेला इस्लामच्या पवित्र कायद्याला शरीयत
असे म्हटले जाते. शरीयतचा
कायदा पवित्र, चिरंतन, सर्वस्पर्शी, सर्वकालिक असून त्याचे पालन करणे हे प्रत्येक
मुसलमानाचे कर्तव्य आहे. मुस्लिमांचा
व्यक्तिगत कायदा हा शरीयतचा भाग असून त्यात विवाह, घटस्फोट, वारसा हक्क,
स्त्रियांचे हक्क, मालमत्तेच्या वाटणीचे कायदे यांचा समावेश होतो. मुळ इस्लामी शरीयतमध्ये व्यक्तिगत
कायदा असे वर्गिकरण नसून व्यक्तिगत कायदा ही ब्रिटीशांची निर्मीती आहे. ब्रिटीशांनी पवित्र कुराण, हदिस
यांचा स्वत: अर्थ लावून मुस्लिमांचे व्यक्तिगत कायदे तयार केले, त्यास शरीयतचा
कायदा म्हणतात. हे
कायदे इस्लामी शिकवणूकीपासून ढळलेले व विपर्यस्त आहेत, असे ताहीर मंहमद यांचे मत
आहे. (सं.
डॉ. विजया
वाड (सं.)‚ ‘मराठी
विश्वकोश खंड 17’‚ महाराष्ट्र
राज्य विश्वकोश निर्मीती मंडळ‚ मुंबई‚ 2007‚ पृष्ठ क्र. 609.)
5. बेन्नूर
फक्रुद्दीन‚ हमीद
दलवाई : एक प्रचंड ज्वालामुखी‚ साधना
(साप्ताहिक)‚ 18
जून 1977‚ पृष्ठ
क्र.
10.
6. घागरे
सुचित्रा‚ उपरोक्त‚ पृष्ठ क्र. 4.
7. दलवाई मेहरूनिस्सा‚ मी
भरून पावले आहे, साधना प्रकाशन‚ पुणे,
9 ऑगस्ट 1995‚ पृष्ठ
क्र. 78.
8. नगरकर
वसंत‚ त्यांचे
कार्य निश्चित चालू राहील‚ साधना
(साप्ताहिक)‚ 14
मे 1977‚ पृष्ठ
क्र. 27.
9. गर्गे
स. मा. (सं)‚ भारतीय समाजविज्ञान कोश खंड 3‚ समाजविज्ञान मंडळ‚ पुणे‚ 1989‚ पृष्ठ क्र. 56.
10. जोशी
लक्ष्मणशास्त्री‚ उपरोक्त‚ पृष्ठ क्र. 784.
11. दलवाई मेहरूनिस्सा‚ उपरोक्त‚ पृष्ठ क्र. 82.
12. जोशी
लक्ष्मणशास्त्री‚ उपरोक्त‚ पृष्ठ क्र. 785.
13. दलवाई मेहरूनिस्सा‚ उपरोक्त‚ पृष्ठ क्र. 87 – 88.
14. गनी
फरास‚ देव
निर्मीत कायद्यात बदल नको म्हणणा–यांची
मुंबई परिषद‚ मुस्लिम
सत्यशोधक पत्रिका‚ मुस्लिम
सत्यशोधक मंडळ (महाराष्ट्र)
प्रकाशन‚ कोल्हापूर‚ जानेवारी 1973‚ पृष्ठ क्र. 15.
15. दलवाई मेहरूनिस्सा‚ उपरोक्त‚ पृष्ठ क्र. 90
16. जमादार
हुसेन‚ ‘महाराष्ट्र
मुस्लिम सामाजिक परिषद’‚ मुस्लिम
सत्यशोधक पत्रिका‚ उपरोक्त‚ मे 1973‚ पृष्ठ क्र. 7.
17. जोशी
लक्ष्मणशास्त्री‚ उपरोक्त‚ पृष्ठ क्र. 785.
18. जमादार
हुसेन‚ (शब्दांकन–चव्हाण अनिल)‚ ‘मुस्लिम
सत्यशोधक समाज एक धर्मसुधारणा चळवळ’ अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्र‚ नोव्हें – डिसें 2009‚ पृष्ठ क्र. 57.
19. जोशी
लक्ष्मणशास्त्री‚ उपरोक्त‚ पृष्ठ क्र. 785.
20. थत्ते
यदुनाथ‚ ‘अशी
मंडळी बहुत असावी’‚ शारदा
प्रकाशन‚ नांदेड‚ एप्रिल 1979‚ पृष्ठ क्र. 54.
21. नगरकर
वसंत‚ उपरोक्त‚ पृष्ठ क्र. 27.
22. दलवाई मेहरूनिस्सा‚ उपरोक्त‚ पृष्ठ क्र. 133.
23. दलवाई मेहरूनिस्सा‚
पृष्ठ क्र. 82 – 83.
24. दलवाई मेहरूनिस्सा‚ उपरोक्त‚ पृष्ठ क्र. 84.
25. जोशी
लक्ष्मणशास्त्री‚ उपरोक्त
खंड 13‚ पृष्ठ
क्र. 784.
26. बेन्नूर
फक्रुद्दीन‚ उपरोक्त‚ पृष्ठ क्र. 11.
27. दलवाई हमीद‚ ‘वंदे
मातरम’‚ मुस्लिम
सत्यशोधक पत्रिका‚ उपरोक्त‚ मे 1973‚ पृष्ठ क्र. 2.
28. गर्गे
स. मा.‚ उपरोक्त‚ पृष्ठ क्र. 57.
29. दलवाई मेहरूनिस्सा‚ उपरोक्त‚ पृष्ठ क्र. 121.
30. बेन्नूर
फक्रुद्दीन‚ उपरोक्त‚ पृष्ठ क्र. 7.
हमीद
दलवार्इ यांचे मुस्लिम समाज सुधारणेचे कार्य
गोषवारा
:
प्राचीन ऐतिहासीक वारसा लाभलेल्या भारतीय समाजात अनेक प्रथा‚ परंपरा‚ रितीरिवाज असून कालौघात त्यात काही दोष निर्माण झाले. ते सामाजिक स्वाथ्याला बाधक ठरू लागल्याने त्यांच्या निर्मूलनाची आवश्यकता निर्माण झाली. त्यातूनच समाज सुधारणा चळवळींची सुरूवात झाली. मुस्लिम समाज सुधारणेसाठी आपले जीवन समर्पित करणारे हमीद दलवार्इ हे एक उपेक्षित व दुर्लक्षित राहिले आहेत. म्हणून प्रस्तुत शोधनिबंधात त्यांनी मुस्लिम समाज सुधारणेसाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी प्राथमिक व दुय्यम संदर्भ साधनांचा वापर केला आहे.
धर्माच्या
जबरदस्त प्रभावामुळे तत्कालीन मुस्लिम स्त्रियांची परिस्थिती अतिशय दयनिय होती. स्त्रियांची ही परिस्थिती बदलणे, मुस्लिम
समाजावरील धर्माचा प्रभाव कमी करून त्यांचे भारतीयकरण करणे या विचाराने प्ररित होऊन
हमीद दलवार्इंनी आपले जीवन समर्पित केले. स्त्रियांवर
होणारे अत्याचार‚ तोंडी
तलाक‚ बहुभार्या पध्दत‚ पडदा
पध्दत याविरूध्द त्यांनी कार्य केले. मुस्लिम
समाजाच्या प्रगतीसाठी विज्ञानावर आधारित प्रादेशिक भाषेतून शिक्षण‚ समान नागरी कायदा‚ कुटुंबनियोजन इ.चा त्यांनी पुरस्कार केला. त्यासाठी मोर्चे‚ निदर्शने‚ निवेदने‚ ठराव‚ अधिवेशने‚ परिषदा‚ जाहिर व खाजगी चर्चा इ. मार्गांचा त्यांनी अवलंब केला. आपल्या कार्याला संघटितपणा आणण्यासाठी त्यांनी
पुण्यात 1970 मध्ये ‘मुस्लिम
सत्यशोधक मंडळा’ची स्थापणा केली. त्यांच्या कार्याच्या प्रभावामुळे त्यांच्या
मागे अल्पावधीतच बाबूमिया बॅण्डवाले‚ सय्यद
भाई‚ शेख वझीर पटेल‚ हुसेन
जमादार‚ प्रा. मुमताज रहिमतपुरे इ. कार्यकर्त्यांची फळी खंबीरपणे उभी राहिली.
इस्लामच्या चौदाशे वर्षांच्या इतिहासात इस्लामची तर्ककठोर चिकित्सा करणारा व कालबाह्य प्रथानांविरोध करणारा द्रष्टा समाजसुधारक हमीद दलवाई व्यतिरिक्त दुसरा झाला नाही. त्यामुळेच त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेणे आवश्यक ठरते.
No comments:
Post a Comment